कुरकुंभ (दि.१४)– श्री फिरंगाईमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षिका सौ. उज्वला रमेश थोरात यांना दौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघ, महिला शिक्षिका संघ, उच्च माध्यमिक शिक्षक संघ, सेवानिवृत्त शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता थोरात वाडा खुटबाव येथे भव्य उत्साहात पार पडला. या प्रसंगी माजी आमदार श्री. रमेश आप्पा थोरात, शिक्षक लोकशाही आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जी.के. थोरात, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे तसेच उत्कर्ष शिक्षण संस्थेचे सचिव श्री सचिन शितोळे यांच्या शुभहस्ते सौ. उज्वला थोरात यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
उत्कृष्ट अध्यापनासह क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शन व विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांची जाणीव जागृत करण्यासाठी तसेच शैक्षणिक उपक्रमांमधील नवनवीन प्रयोग त्यातून विद्यार्थी विकास व त्यांचे यश यामध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.या यशाबद्दल उत्कर्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य श्री केशवराव शितोळे कार्याध्यक्ष श्री अनिल शितोळे व उत्कर्ष शिक्षण संस्थेचे सचिव सचिन शितोळे , विद्यालयाचे प्राचार्य श्री भरत शितोळे, पर्यवेक्षक श्री दिलीप ससाने, विभाग प्रमुख श्री नवनाथ खोमणे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व पालकांनी सौ. थोरात मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या कार्यामुळे विद्यालयाचा गौरव वाढल्याचे मत व्यक्त करण्यात आले.