दौंड : (दि.28)पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे विज्ञान प्रदर्शन तसेच ‘मॅप्स टू ॲप्स’ या अभिनव शैक्षणिक संकल्पनेचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांचा उत्कृष्ट संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. शाळेच्या प्रांगणात विविध विषयांवरील मॉडेल्स, प्रात्यक्षिके आणि डिजिटल सादरीकरणांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नामांकित वास्तुविशारद अक्षय नाईक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक करत त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जिज्ञासा व सातत्य आवश्यक असल्याचे सांगितले. “आजचे विद्यार्थीच उद्याचे नवोन्मेषक आहेत,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या स्वाती कणसे होत्या. उपप्राचार्या नीलम अग्रवाल, प्रशासकीय प्रमुख नितीन करे, शिशुविभाग प्रमुख श्वेता तोरस्कर तसेच संयोजक अतुल मोरे उपस्थित होते.
‘मॅप्स टू ॲप्स’ संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी पारंपरिक नकाशांपासून डिजिटल ॲप्सपर्यंतचा प्रवास सादर केला. तसेच विज्ञान प्रदर्शनात सौरऊर्जा, जलसंवर्धन, स्मार्ट सिटी, रोबोटिक्स व पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवरील मॉडेल्स सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रकल्पामागील वैज्ञानिक तत्त्वे आत्मविश्वासाने स्पष्ट केली. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड व सर्जनशील विचारसरणी विकसित करणारा ठरला.