दौंड : पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे “कला घडवते भविष्य” या संकल्पनेवर आधारित भव्य कला प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पालक, शिक्षक आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. 
प्रदर्शनाचे मुख्य अतिथी नामांकित वास्तुविशारद अक्षय नाईक होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे निरीक्षण करून त्यांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले. आपल्या मनोगतात ते म्हणाले की, कला ही केवळ रंगांची अभिव्यक्ती नसून ती विचारांना दिशा देणारी शक्ती आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि नवसर्जनाची प्रेरणा मिळते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या स्वाती कणसे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. उपप्राचार्या नीलम अग्रवाल यांनी कला शिक्षणाचे महत्त्व आधोरेखित केले. यावेळी आरएएफ पुणे २ चे प्रतिनिधी मुकेश दहाळे, शाळेचे प्रशासक नितीन करे , शिशुविभाग प्रमुख श्वेता तोरस्कर तसेच कार्यक्रमाचे आयोजक अतुल मोरे उपस्थित होते.
प्रदर्शनात चित्रकला, रेखाचित्रे, मातीच्या प्रतिकृती, कागदी हस्तकला, पुनर्वापर साहित्यापासून तयार केलेल्या वस्तू तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या त्रिमिती कलाकृती सादर करण्यात आल्या. ‘पर्यावरण संरक्षण’, ‘भविष्यकालीन शहरे’ आणि ‘तंत्रज्ञान व निसर्गाचा समतोल’ या विषयांवरील कलाकृती विशेष आकर्षण ठरल्या.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला नवी दिशा देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची झलक दाखवणारा ठरला.