दौंड – पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. दिवसभर शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून क्रीडांगण दणाणून सोडले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रधानाध्यापिका स्वाती कणसे यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली.
त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “क्रीडा ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीचे साधन नसून मानसिक ताकद, शिस्त आणि व्यक्तिमत्व विकासाचे खरे दालन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने क्रीडा क्षेत्रातून शिकलेले धडे जीवनातील प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडतात.” या कार्यक्रमाला उपप्रधानाध्यापिका नीलम अग्रवाल, प्रशासन अधिकारी नितिन कऱे, तसेच क्रीडा शिक्षक विशाल पवार, विद्या घडशी व वृषाली माने यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह अधिकच द्विगुणित झाला.
कार्यक्रमादरम्यान तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या १७ वर्षे वयोगटातील मुलींचा शाळेत विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या चिकाटी, मेहनत व उत्कृष्ट खेळामुळे शाळेचा लौकिक वाढला. समारोपाच्या वेळी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक सक्रिय राहण्याचे व यश मिळवण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील क्रीडा विभागाने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून शारीरिक शिक्षणाचा आदर्श निर्माण केला.