दौंड – पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात, उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात विद्यार्थी, व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित ठिकठिकाणी तिरंगी सजावट, फुगे आणि फुलांच्या तोरणांनी परिसर सुशोभित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर अब्दुल हादी मोहम्मद इसाक बिद्री व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती कणसे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर सर्वांनी अभिमानाने राष्ट्रगीत गायले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या तोंडून घोषणाबाजी व देशभक्तिपर घोषणा घुमल्या. या कार्यक्रमामध्ये PTA सदस्या वृषाली बोरकर व मोहिनी देवकर उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. देशभक्तिपर गीत, नृत्य, भाषण, देशातील वीरांच्या कथा आणि प्रेरणादायी नाटिका यामुळे वातावरण प्रसन्न झाले. विशेषतः प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांनी केलेले “भारत माझा देश आहे” या विषयावरचे समूहनृत्याने सर्वांची मने जिंकली. माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या घटनांचे नाट्यरूपांतरण करून उपस्थितांना इतिहासाची आठवण करून दिली.
प्रमुख पाहुणे अब्दुल हादी मोहम्मद इसाक बिद्री यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत जागरूक राहण्याचा, तसेच देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे योगदान देण्याचा संदेश दिला.
मुख्याध्यापिका स्वाती कणसे यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागाची आठवण करून देत विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीसाठी सुशिक्षित, जबाबदार आणि प्रामाणिक नागरिक बनण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “आजचा दिवस हा फक्त उत्सव नसून आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे.” कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासकीय अधिकारी नितिन करे, कार्यक्रम समन्वयक श्री. अतुल मोरे, शिक्षकवर्ग, सहाय्यक कर्मचारी व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. शेवटी सर्वांनी एकत्रितपणे “वंदे मातरम्” या घोषणेसह कार्यक्रमाची सांगता झाली. हा स्वातंत्र्य दिन सोहळा सर्वांच्या मनात अभिमान, देशभक्ती व एकतेचा संदेश देऊन गेला.