पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे “आषाढी एकादशी” निमित्ताने भक्तीमय आणि उत्साही वातावरणात भव्य सोहळा(द महाराष्ट्र न्यूज दौंड)
दौंड: पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड येथे “आषाढी एकादशी” निमित्ताने भक्तीमय आणि उत्साही वातावरणात भव्य सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. परिसर संपूर्ण भक्तिरसाने प्रसन्न झाले होते. इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी मिरवणूक सादर केली. या दिंडीचे खास आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग गायन करीत “माऊली माऊली” च्या जयघोषात संपूर्ण शाळा भक्तिमय रंगात रंगली. विठ्ठल-रुक्मिणीची पूजा, फुगडीसारखे पारंपरिक खेळ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे दिंडीला विशेष आकर्षण लाभले.
विशेष म्हणजे शिक्षकवर्गही विद्यार्थ्यांबरोबर फुगडीमध्ये सहभागी होत आनंद लुटत होता. इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी कानगाव (ता. दौंड) येथे जाऊन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिंडीचे आयोजन केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात काढलेल्या या दिंडीमध्ये “वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा” अशा घोषणांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. या वेळी केवळ विद्यार्थीच नव्हे, तर गावातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दिंडीमध्ये डॉ. बापूराव फडके, सरडे काका, दिवेकर, योगेश चौधरी आणि विक्रम यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली, त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व आणखीनच वाढले.या भक्तिपूर्ण सोहळ्यात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कणसे मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. नीलम अग्रवाल मॅडम, प्रशासक श्री. नितीन करे सर, कार्यक्रम संयोजक अतुल मोरे सर, संगीत शिक्षक संजय मोरे सर आणि सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुख्याध्यापिका सौ. स्वाती कणसे मॅडम यांनी आपल्या भाषणात सांगितले, “आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक सोहळा नसून, समाजात एकात्मतेचा संदेश देणारा आणि पर्यावरण जतनासाठी जनजागृती घडवणारा महत्त्वपूर्ण उत्सव आहे.”मुख्याध्यापिका सौ. स्वाती कणसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक-विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहभागातून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.