दौंड: पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे जाहिरात व माध्यम जागरूकता या विषयावर आधारित शालेय उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीमातेच्या पूजनाने करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस निरीक्षक श्री. अजित झांजुर्णे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज) आणि पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार भुजबळ (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज) उपस्थित होते. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. जाहिराती खऱ्या की फसव्या, माध्यमांचे प्रकार, अफवांचे स्वरूप, चुकीच्या माहितीमुळे होणारे परिणाम आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे मार्ग या विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर व मॉडेल्सद्वारे माहिती सादर केली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रफीती, घोषवाक्ये व माहितीचे सादरीकरण पालकांसमोर करण्यात आले. त्यामुळे पालकांनाही माध्यम साक्षरतेविषयी माहिती मिळाली. पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या सर्जनशीलतेचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. झांजुर्णे यांनी विद्यार्थ्यांना माध्यमांचे आपल्या जीवनाशी असलेले नाते आणि जाहिरातींचा मानसिक व सामाजिक परिणाम याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कणसे मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. नीलम अग्रवाल तसेच सर्व शिक्षकवृंद , पालक व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. स्वाती कणसे मॅडम यांच्या उपस्थितीत हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.