सुट्टीत शिक्षकांना निवड, वेतन श्रेणीचे दहा दिवस प्रशिक्षण

राज्यात एकाच वेळी जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ऑनलाइन परीक्षा होणार

दौंड : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत २ जून ते १२ जून २०२५ च्या दरम्यान राज्यात एकाच वेळेस जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी निवडश्रेणी व वेतन श्रेणीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. शिक्षकांनी आपल्या सेवेची १२ वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी तर २४ वर्षे पूर्ण केल्यानंतर निवड श्रेणीचा विशेष आर्थिक लाभ मिळतो.
यापूर्वी प्रशासनामार्फत प्रशिक्षण काळातील निवास, भोजन, व प्रवास खर्च मोफत केला जात होता. मात्र या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन लिंकद्वारे २००० रुपये भरून प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिक्षक सेवेत दाखल झाल्यापासूनची परिस्थिती व त्यानंतर झालेले स्थित्यंतरे याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण मिळणार आहे. नुकतेच राज्यस्तरीय प्रशिक्षण पुणे येथे पार पडले. या प्रशिक्षणातील तज्ज्ञ मार्गदर्शक प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना वर्गात जावून ऑफलाइन स्वरुपात प्रशिक्षण देणार आहेत. पुणे जिल्ह्यात २४९३ प्रशिक्षणार्थीना आपल्या तालुक्यात हे प्रशिक्षण मिळणार आहे. राज्यस्तरावरून एकाच वेळी प्रशिक्षणार्थीची तासिकानिहाय उपस्थिती घेतली जाणार आहे. तसेच ऑनलाइन स्वरुपात मूल्यांकन देखील केले जाणार आहे. निवास, भोजन, प्रवास खर्च किंवा इतर कोणतीही तरतूद येथे उपलब्ध होणार नाही. यावर्षी हे प्रशिक्षण ऑफलाइन स्वरुपात प्रत्यक्ष वर्गात होणार असले तरी प्रत्यक्ष तासिका झाल्यावर निर्धारित वेळेत ऑनलाइन चाचणी सोडवावी लागणार आहे.

परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक

असल्याने सदर प्रशिक्षण ऑनलाइन व ऑफलाइन अशा मिश्र स्वरुपात होणार आहे. यापूर्वी प्रशिक्षणार्थीना ठराविक मुदतीत आपल्या सोयीने प्रशिक्षण करता येत होते. मात्र, यावेळी एकाचवेळी ऑनलाइन लिंकद्वारे संपूर्ण राज्यात एकाच वेळी चाचणी परीक्षा होणार असल्याने एखादा प्रशिक्षणार्थी वर्गात हजर नसल्यास तो प्रशिक्षणात अनुत्तीर्ण होणार आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रशिक्षण घेऊनदेखील शिक्षक अपात्र ठरणार आहेत. दौंड तालुक्यात रयत शिक्षण संस्थेचे नागेश्वर विद्यालय, पाटस या ठिकाणी दोन वर्ग सुरू असून ६० + ३४ शिक्षक या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत.
या प्रशिक्षणासाठी दत्तात्रय कुदळे, शकील पठाण, प्रकाश भगत, सुनिल माने, लालासाहेब साळवे, मोहन सरतापे बाबासाहेब ( मुख्या. स्वामी चिंचोली हायस्कूल ) , रामचंद्र नातू ( मुख्या.आदर्श विद्या. वडगाव बांडे ) हे सुलभक म्हणून कामकाज पहाणार आहेत. या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून संभाजी कुंभार, रत्नाकर अणुभास्कर हे असणार आहेत. ज्ञानेश्वर माळी हे टेक्नीकल कामकाज करणार आहेत.
या प्रशिक्षण वर्गास आज दौंडचे गटशिक्षणाधिकारी संजय महाजन व खुटबाव/ सोनवडी केंद्राचे केंद्रप्रमुख संजय चव्हाण यांनी भेट दिली.विद्यालयाचे मुख्याध्यापक खारतोडे सर यांनी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

Leave a Comment

Read More