राहू (ता. दौंड) – कैलास विद्या मंदिर राहू विद्यालयातील सहशिक्षक श्री. अमोल सोनवणे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आयोजित जिल्हास्तरीय “गुरू सन्मान 2025” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी, पुणे येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्याला मा. ज्ञानेश्वर म्हात्रे (शिक्षक आमदार, कोकण विभाग), माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, शिक्षणतज्ज्ञ महेंद्र गणपुले, अध्यक्ष शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र सुनीलभाऊ जगताप, मुख्य निमंत्रक हरीचंद्र गायकवाड, तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात अमोल सोनवणे सरांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
श्री. सोनवणे यांनी उत्कृष्ट विज्ञान विषयाच्या अध्यापनासह स्पर्धा परीक्षेतील मार्गदर्शन तसेच शैक्षणिक उपक्रमांमधील नवनवीन प्रयोगांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे. या यशाबद्दल कैलास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व आमदार ॲड. राहुलदादा कुल, राहू गावचे सरपंच दिलीप देशमुख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग, तसेच कैलास विद्या मंदिर राहू विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश जगदाळे, उपमुख्याध्यापक शांताराम टिळेकर, पर्यवेक्षक रामदास शिंदे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थीवर्ग यांनी श्री. अमोल सोनवणे सरांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.