विद्यार्थ्यांकडून अनोख्या उपक्रमांतून गुरुजनांना मानवंदना
दौंड – पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे शिक्षक दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने व आनंदमय वातावरणात पार पडला. भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध सांस्कृतिक व सर्जनशील कार्यक्रमांचे आयोजन केले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर गाणी, नृत्य, नाटिका, भाषणं, कविता, प्रहसन आदी एकाहून एक सरस सादरीकरणांनी सभागृह दणाणून गेले. शिक्षकांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांनी घेतलेले वर्ग हा सोहळ्याचा खास आकर्षणबिंदू ठरला.
शिक्षकांसाठी संगीत खुर्ची, अंताक्षरी यांसह अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरणात आनंद आणि हास्यविनोदाची लहर उमटवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी क्रिशा कटारिया व स्नेहल सोनवणे यांनी आत्मविश्वासाने केले. शेवटी प्राचार्या सौ. स्वाती कणसे यांनी मनोगतात शिक्षकांचे योगदान आधोरेखित केले. त्यांनी सांगितले, “शिक्षक हा विद्यार्थ्यांचा खरा मार्गदर्शक असतो. समाजाचे जबाबदार नागरिक घडवणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे.”
या प्रसंगी उपप्राचार्या नीलम अग्रवाल, प्रशासन अधिकारी नितीन करे, शिशुविभाग प्रमुख शकुंतला तोरस्कर, कार्यक्रम समन्वयक अतुल मोरे यांच्यासह शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्या सौ. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी–शिक्षक यांच्यातील नातं अधिक दृढ करणारा ठरला.