खेळातून घडतो सर्वांगीण विकास : पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे क्रीडा दिन उत्साहात साजरा

दौंड : विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी खेळाचे महत्त्व ओळखून पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या वतीने हा क्रीडा दिन दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आला होता. शनिवार, २४ जानेवारी रोजी इयत्ता पहिली ते चौथी, तर २६ जानेवारी रोजी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या क्रीडा दिनात धावण्याच्या स्पर्धा, मैदानी खेळ, संघखेळ, शारीरिक कसरती व मनोरंजक खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्त व खेळातील कौशल्य पाहून उपस्थित पालक व मान्यवर भारावून गेले.
कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती कणसे, उपप्राचार्या सौ. नीलम अग्रवाल, शिशुविभाग प्रमुख सौ. शकुंतला तोरस्कर, प्रशासक प्रमुख श्री. नितिन करे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री. प्रफुल वाघमारे, महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी श्री. तुषार संपत दुबे, श्री. जालिंदर आवारी सर व दीपश्री मानकर हे मान्यवर पाहुणे उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी क्रीडाशिक्षणाचे महत्त्व सांगत खेळातून शिस्त, संघभावना, चिकाटी व नेतृत्वगुण विकसित होतात, असे प्रतिपादन केले. स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
क्रीडा शिक्षक श्री. विशाल पवार, सौ. वृषाली माने व सौ. विद्या घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यक्रम समन्वयक श्री. अतुल मोरे यांच्या सहकार्याने हा क्रीडा दिन यशस्वीपणे पार पडला.

Leave a Comment

Read More