दोन दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव; इतिहास, संस्कृती व जीवनमूल्यांचा नेत्रदीपक आविष्कार
दौंड: पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेले ७ वे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. दोन दिवस चाललेल्या या भव्य सांस्कृतिक पर्वाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला व संस्कारक्षम शिक्षणाला प्रभावी व्यासपीठ मिळवून दिले. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि सांस्कृतिक परंपरेची ठळक छाप या स्नेहसंमेलनातून पुन्हा एकदा उमटली. यावेळी शाळा परिसरात विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट आणि थीमनुसार उभारलेल्या भव्य रंगमंचामुळे वातावरण उत्सवमय व प्रसन्न होते. पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
पहिला दिवस : “नवरत्न – अकबर की खोज”
स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी “नवरत्न – अकबर की खोज”. या संकल्पनेच्या माध्यमातून मुघल सम्राट अकबर आणि त्याच्या नवरत्नांची कथा केवळ कथन न राहता अनुभवात्मक स्वरूपात रंगमंचावर साकारण्यात आली. नृत्यनाट्य, संवाद, कथाकथन, समूहगायन आणि प्रभावी प्रकाशयोजनेच्या साहाय्याने इतिहासाचा जिवंत पट उलगडण्यात आला. न्याय, बुद्धिमत्ता, सहिष्णुता, शौर्य आणि सांस्कृतिक समन्वय यांसारख्या मूल्यांचा ठळक संदेश विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून आधोरेखित झाला. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भूमिकांमधून अभ्यासपूर्ण तयारी, आत्मविश्वास आणि शिस्त स्पष्टपणे दिसून आली. बीरबलची बुद्धिमत्ता, तानसेनचे संगीत, राजा तोडरमल यांची प्रशासनिक दूरदृष्टी तसेच अबुल फजल यांची विद्वत्ता विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे रंगमंचावर उतरवली. प्रत्येक प्रसंगाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट लाभत होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. सुनील सरोदे (उपविभागीय पोलीस अधिकारी – DYSP व वरिष्ठ सहाय्यक कमांडंट, SRPF ग्रुप ५, दौंड–पुणे) होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, “इतिहासातून प्रेरणा घेऊन शिस्त, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठा जोपासली पाहिजे. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळेच जबाबदार नागरिक घडतात,” असे मत व्यक्त केले.
तसेच यावेळी उपस्थित मान्यवर श्री. मनोज काळे – जनरल मॅनेजर, पुणे (रीजन २), श्री. निलेश पाटील – मेंटर प्रिन्सिपल, MH Compliance, श्री. ए. के. सिंग – प्राचार्य, PIS हडपसर, सौ. नीता कुमार – प्राचार्य, PIS खोपोली, सौ. मिनल वैद्य – प्राचार्य, PIS मांजरी, श्री. मंगेश जगताप – प्राचार्य, PIS अहिल्यानगर, श्री. नीरज राय – प्राचार्य, PIS शिरूर, श्री. संजीव कुमार भारद्वाज – प्राचार्य, PIS उंड्री, सौ. सिमरन कौर – प्राचार्य, PIS चाकण, सौ. अनामिका मगरडे – प्राचार्य, PIS PBS चाकण व उद्योजक श्री. किरण फराटे उपस्थित होते
दुसरा दिवस : “द स्टोरी क्विल्ट – एव्हरी स्टिच टेल्स अ टेल”
स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आलेली संकल्पना होती “द स्टोरी क्विल्ट : एव्हरी स्टिच टेल्स अ टेल”. या थीममध्ये जीवनातील विविध कथा, भावना, नाती, संस्कृती आणि परंपरा एका ‘क्विल्ट’प्रमाणे सुंदररीत्या गुंफण्यात आल्या. प्रत्येक सादरीकरणातून स्वतंत्र सामाजिक व नैतिक संदेश देण्यात आला. अखेरीस समाजातील ऐक्य, प्रेम, सहिष्णुता आणि मानवतेचा प्रभावी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्ये, गीते आणि लघुनाट्ये या दिवसाचे विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या निरागस हावभावांनी, उत्साही हालचालींनी आणि रंगीबेरंगी वेशभूषेने संपूर्ण सभागृह भारावून गेले. दुसऱ्या दिवसाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. बापूराव दादास (DYSP, दौंड पोलीस स्टेशन) हे होते सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. तुषार बोरकर (महसूल तहसीलदार, दौंड) उपस्थित होते. याशिवाय श्री. ज्ञानेश्वर पलंगे (PSI, मायलुंड पोलीस स्टेशन) आणि श्री. जालिंदर आवारे (अध्यक्ष, दौंड तालुका क्रीडा शिक्षक संघ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या भव्य स्नेहसंमेलनाच्या यशामागे प्राचार्या सौ. स्वाती कणसे यांचे दूरदर्शी नेतृत्व, श्री. अतुल मोरे (कार्यक्रम संयोजक) यांचे शिस्तबद्ध नियोजन, श्री. हर्षल पोतदार व श्री. संतोष कारंडे यांचे व्यवस्थापन कौशल्य, उपप्राचार्या सौ. नीलम अग्रवाल, प्रशासन अधिकारी श्री. नितीन करे, तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचे अथक परिश्रम कारणीभूत ठरले. विद्यार्थ्यांच्या दीर्घकालीन तालमी, आकर्षक वेशभूषा, प्रभावी रंगमंच रचना, प्रकाशयोजना आणि वेळेचे काटेकोर नियोजन यामुळे कार्यक्रम अत्यंत उच्च दर्जाचा ठरला. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत (अकॅडेमिक टॉपर) विद्यार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट व कार्यकुशल शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव व सन्मान करण्यात आला. पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथील ७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाने शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम नसून संस्कार, कला, सर्जनशीलता आणि जीवनमूल्यांची जडणघडण आहे, हे ठळकपणे सिद्ध केले. दोन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक पर्वाने शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला नवा आयाम दिला असून उपस्थित मान्यवर व पालकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.