भविष्यकालीन शिक्षणाचा नवा अध्याय
दौंड ( दि.१४)– शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्जनशीलता आणि डिजिटल कौशल्यांचा विकास साधण्यासाठी अत्याधुनिक इनोव्हेशन लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबच्या उद्घाटन प्रसंगी संपूर्ण शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या प्राचार्या स्वाती कणसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्या नीलम अग्रवाल, प्रशासकीय अधिकारी नितीन करे, शाळेचे समन्वयक अतुल मोरे, शिक्षकवृंद, पालक शिक्षक संघाचे सदस्य ,पालक मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या लॅबचे इन-चार्ज शिक्षक विचित्र उपाध्याय असून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध तांत्रिक प्रकल्पांची आखणी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी रोबोटिक्स, कोडींग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन तंत्रज्ञान, व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) आणि 3D प्रिंटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणार आहेत. लॅबच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी थेट प्रयोग सादर करून पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. काहींनी स्वतः तयार केलेले स्वयंचलित रोबोट्स दाखवले, तर काहींनी 3D प्रिंटिंगद्वारे तयार केलेल्या वस्तू सादर केल्या. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी सोप्या कोडींगच्या सहाय्याने लहान लहान गेम्स तयार करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या वेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याला दाद देत शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी प्राचार्या स्वाती कणसे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की –“इनोव्हेशन लॅब ही केवळ प्रयोगशाळा नसून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वास्तवात उतरवणारे व्यासपीठ आहे. यातून मुलांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशील विचारशक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि डिजिटल कौशल्ये विकसित होतील. हा उपक्रम म्हणजेच विद्यार्थ्यांना भविष्यकालीन शिक्षणाशी जोडणारा पूल आहे”. पोदार एज्युकेशन नेटवर्कने देशभरातील आपल्या सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने अशा इनोव्हेशन लॅब्स सुरू करण्याचा संकल्प केला आहे. या लॅब्समुळे ग्रामीण वा शहरी कोणत्याही भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळून त्यांचे भविष्य अधिक सक्षम होणार आहे.