गणेशोत्सव हा आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांची शिकवण देणारा उत्सव – प्राचार्या स्वाती कणसे
दौंड – पोदार इंटरनॅशनल स्कूल, दौंड येथे नऊ दिवसांचा गणेशोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांपासून शिक्षक, शालेय कर्मचारी व पालकांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवात पाहायला मिळाला. नित्य सकाळ-संध्याकाळी गणेश आरती, प्रसाद वितरण, तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेले भजन, श्लोक पठण आणि भक्तिगीतांनी वातावरण अधिक पवित्र झाले.
शेवटच्या दिवशी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकाच्या तालावर आणि विद्यार्थ्यांच्या आकर्षक फॉर्मेशनने सजलेल्या भव्य विसर्जन मिरवणुकीने या उत्सवाची सांगता झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या संकल्पनेवर आधारित नाटिका, भाषण, गीत व नृत्य सादर करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, एकात्मता आणि संस्कृती जपण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमास प्राचार्या स्वाती कणसे मॅडम, उपप्राचार्या नीलम अग्रवाल मॅडम, प्रशासक प्रमुख नितिन करे सर, शिशुविभाग प्रमुख शकुंतला तोरस्कर मॅडम तसेच कार्यक्रम समन्वयक अतुल मोरे सर उपस्थित होते. प्राचार्या स्वाती कणसे मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, “गणेशोत्सव हा विद्यार्थ्यांना आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांची शिकवण देणारा सण आहे. या सणातून एकात्मतेचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश घ्यावा, हेच या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे.” सामूहिक आरती व प्रसाद वितरणानंतर पारंपरिक पद्धतीने विसर्जन सोहळा पार पडला आणि गणेशोत्सवाचा भव्य समारोप झाला.