केंद्रशासन पुरस्कृत उल्हास – नव भारत साक्षरता कार्यक्रम
दौंड (दि .18)- पुणे विकास गटामध्ये निरक्षरांची संख्या कमी करण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत उल्हास – नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे .या कार्यक्रमांतर्गत निरक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे सन 2024/25 मध्ये नोंदणी झालेल्या निरक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे
.दौंड तालुक्यामध्ये उल्हास ॲपवरती एकूण 1582 निरक्षरांची ऑनलाइन पद्धतीने नोंद झालेली आहे . तालुक्यामधील 284 केंद्रावरती ही परीक्षा सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत घेण्यात येईल. या परीक्षेतील प्रश्नपत्रिकाही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यांच्याशी संबंधित असून तीन भागांमध्ये विभागलेली एकूण 150 गुणांची असणार आहे. त्यामध्ये अनुक्रमे वाचन 50 गुण लेखन 50 गुण व संख्याज्ञान 50 गुण अशी दीडशे गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी 33% म्हणजे 17 गुण अनिवार्य आहेत व एकूण गुण दीडशे पैकी 33% म्हणजे 51 गुण अनिवार्य असतील कोणत्याही एका भागाचे 33 टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त पाच वाढीव गुण देण्यात येतील परंतु तीनही भागांचे मिळून पाच पेक्षा अधिकचे गुण देता येणार नाहीत .परीक्षेसाठी ऑनलाईन नोंद झालेले परंतु टॅग न झालेले निरक्षरही परीक्षा देऊ शकतात. परीक्षेला जाताना निरक्षर व्यक्तीने स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो ,जन्म तारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र ,आधार कार्ड ,पॅन कार्ड ,बँक पासबुक, इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. निरक्षर व्यक्तीने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन 23 मार्च रोजी परीक्षा द्यावी.(द महाराष्ट्र न्यूज टीम दौंड)